पवार कुटुंबियांवरील छापे म्हणजे राजकीय षडयंत्र
देशभरातील शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : देशभर वाढलेले इंधनदर, महागाईचा आगडोंब उसळला आहे. रोजच वाढत्या महागाईमुळे देशभरातील नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात तीव्र असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात वाहने अंगावर घालून त्यांना चिरडून ठार करण्यात आले. यामुळे देशभरातील शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. याकडे माध्यमांचे लक्ष जाऊ नये या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी व कार्यालयात ईडी आणि आयटीचे छापे टाकण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुरु केलेली ही कारवाई सुडबुद्दीचे आणि नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे राजकीय षडयंत्र असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली.

गुरुवार पासून ईडी आणि आयटी विभागाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी व कार्यालयात छापे टाकले आहेत. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने आंदोलन केले.

आमदार आण्णा बनसोडे म्हणाले की, भाजपच्या आजी-माजी मंत्र्यांचेही साखर कारखाने व इतर उद्योग, व्यवसाय आहेत. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई नाही. पुरोगामी महाराष्ट्रात औद्योगिक व सामाजिक क्रांती घडविणारे लोकनेते शरद पवार यांनी लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनावर टिपणी केली. त्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारच्या ईडी व आयटीने ही कारवाई केली.
माजी आमदार विलास लांडे या कारवाईबाबत केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले की, केंद्राची ईडी व आयटी हे मोदी, शहा यांचे घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहेत. मोदी, शहा यांच्या ईशाऱ्यावर डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे वागत आहेत. राजकारणातून समाजकार्य कसे करावे याचा आदर्श म्हणजे लोकनेते शरद पवार आणि अजित पवार हे आहेत. त्यांच्या कुटूंबियांना त्रास देऊन महाराष्ट्रातील राजकरण विस्कळीत करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे.