भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना…
१८ वर्षांवरील सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा

लोकवार्ता।प्रतिनिधी
देशात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मोठी घट होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत आता वाढ होत आहे. काल प्रथमच दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्याही खाली आली आहे.

गेल्या २४ तासांत देशामध्ये ८६ हजार ४९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एका दिवसात एक लाखाहूनही कमी बाधित आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर देशातल्या कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आजही बाधितांच्या संख्येपेक्षा जास्तच आहे. देशात काल दिवसभरात एक लाख ८२ हजार २८२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या १३ लाख ३हजार ७०२ झाली आहे.
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. काल दिवसभरातल्या देशातल्या मृत्यूंची संख्या २,१२३ इतकी आहे. त्यामुळे देशातल्या करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता तीन लाख ५१ हजार ३०९वर पोहोचली आहे.
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. गेल्या २४ तासात देशातल्या ३३ लाख ६४ हजार ४७६ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी ३० लाख ३८ हजार २८९ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या तीन लाख २६ हजार १८७ इतकी आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा सोमवारी केली. नवे धोरण २१ जूनपासून लागू होणार असून, संपूर्ण लसखरेदी केंद्राकडूनच करण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या आर्थिक ओझ्यातून राज्यांची मुक्तता होणार आहे.