लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

सप्टेंबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट

सज्ज राहा आणि दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा

lokvarta
lokvarta

लोकवार्ता । प्रतिनिधी

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दैनंदिन व्यवहाराची गाडी पुन्हा रुळावर येतेय. लसीकरणाचा वेगही वाढला आहे. अशातच नीती आयोगाने एक गंभीर इशारा दिला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तिसरी लाट इतकी भयंकर असेल की, दिवसाला ४ ते ५ लाख रुग्ण सापडतील. प्रत्येकी १०० पॉझिटिव्ह रुग्णांमागे २३ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. त्यामुळे सज्ज राहा आणि दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा अशी सूचनाही आयोगाने दिली आहे.

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील गटाने केंद्र सरकारला हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या लाटेने जबरदस्त तडाखा दिला. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये दुसरी लाट येईल असा अंदाज नीती आयोगाने वर्तवला होता. ती लाट या वर्षी एप्रिल, मे महिन्यांत आली. संसर्ग इतका वेगाने होत होता की, रोज चार लाखांहून अधिक रुग्ण सापडत होते. कोरोनाच्या दुसऱया लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास करून नीती आयोगाने तिसऱया लाटेचे भाकीत वर्तवले आहे. १ जून रोजी देशात १८ लाख कोरोनाग्रस्त रुग्ण होते. त्यातील २१.७४ टक्के रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले होते. २.२ टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागांमध्ये (आयसीयू) उपचार द्यावे लागले होते.

मागील दोन लाटांमधील रुग्णसंखा आणि सद्यस्थितीचा अभ्यास करून नीती आयोगाने सरकारला संभाव्य तिसऱया लाटेबद्दलचा अहवाल दिला आहे. त्याबरोबरच तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. दुसऱया लाटेमध्ये रुग्णसंख्या अधिक आढळलेल्या दहा राज्यांनी तिसरी संभाव्य लाट लक्षात घेऊन आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

मागील अनुभवावरून तिसऱया लाटेच्या तीव्रतेचा अंदाज
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये १०० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यातील २.४३ जणांना आयसीयूची गरज भासली होती. ८० जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते आणि त्यातील ५५ जणांना कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.
पहिल्या लाटेतील कोविड रुग्णालये आणि त्यातील बेडचा वापर या आधारावर दुसऱया लाटेतील संभाव्य धोक्याचा अंदाज बांधला गेला होता.
दुसऱया लाटेमध्ये प्रत्येकी १०० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागेल आणि त्यातील ३ जणांना आयसीयूची गरज भासेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

काय होईल?
व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेडची आवश्यकता
५ लाख ऑक्सिजन बेडसह ७ लाख नॉन-आयसीयू बेडची गरज
१० लाख आयसोलेशन केअर बेडही सज्ज ठेवा

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani