रुग्णालयात जात असताना अपघातात बहिणीचा मृत्यू
डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : भाऊ बहीणीला दुचाकीवरून रूग्णालयात घेऊन जात असताना दुचाकी ट्रकचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बहीणीचा मृत्यू झाला आहे. पुणे-आळंदी रोडवरील तापकीर चौक, चौविसावाडी याठिकाणी शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. शिल्पा राजेंद्र वाल्हेकर (वय ४९, रा. संगमनेर, अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महीलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ अजय ओमप्रकाश ससाणे (वय ४१, रा. मुळशी, मुळगाव-थेरगाव, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार ट्रक चालक मनोजकुमार सिताराम भोसले (वय २८, रा मळनगाव, कवठेमहाकाळ, सांगली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीमनुसार, फिर्यादी अजय, बहिण शिल्पा यांना दुचाकीवरून आळंदी येथील रूग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी तापकीर चौक, चौविसावाडी याठिकाणी पाठीमागून आलेल्या सहा चाकी ट्रकने (एमएच ४१/ ईएम ७११६) दुचाकीला डाव्या खाजूने धक्का दिला. त्यामुळे फिर्यादी जमीनीवरती पडले तर, त्यांची बहीण शिल्पा यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करीत आहेत.