दप्तराचे वजन कमी होणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
लोकवार्ता : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकातच वह्यांची कोरी पाने देण्याचा विचार मांडला होता. या निर्णयाबाबत शिक्षकांची मते काय आहेत? याची चाचपणी राज्य सरकारकडून केली जात आहे. यासाठी बालभारतीने शिक्षकांकडून वास्तवदर्शी माहिती मिळविण्यासाठी २० प्रश्नांची एक लिंक तयार केली आहे. यावर मते मागवण्यात आली आहेत. वर्गनिहाय प्रश्नावली मांडून शिक्षकांकडून त्यावर अभिप्राय मागवण्यात आले आहेत. मात्र, अनेक शिक्षकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली असून पाठ्यपुस्तकांमध्ये मोजकीच कोरी पाने दिल्यामुळे मुलांचा लेखन अभिव्यक्ती संकुचित होण्याचा धोका संभवण्याची भीती व्यक्त केली आहे.

बालभारतीने शिक्षकांना https://academics.balbharati.in/notebook ही लिंक पाठवली आहे. लिंकवर सर्वेक्षणा मागील उद्देश स्पष्ट केला आहे. २० प्रश्न विचारले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात अनेक मुले पाठ्यपुस्तके पुन्हा वापरतात. कोरी पाने देण्याचा निर्णय तर्कसंगत नाही. पाठ्यपुस्तके जाडजूड होऊन दप्तराचे ओझे वाढेल. त्याऐवजी मुलांना कोऱ्या वह्या आणि स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात. दोन सत्रांत दोन पुस्तके हवी, पाठ्यपुस्तकात कोरी पान देण्याचा निर्णय चांगला आहे. परंतु, हा निर्णय प्रत्यक्षात आणताना दप्तराचे ओझे वाढणार नाही ना याचा विचार व्हावा. तसेच दोन सत्रांतही पुस्तके ही वेगवेगळी असायला हवीत, असे मत काही शिक्षकांनी मांडले आहे.
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आणि बाळासाहेबांनी गाजवलं भाषण
बालभारतीकडून दरवर्षी केवळ जिल्हा परिषद, महापालिका आणि अनुदानित शाळांनाच मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. उर्वरित मोठा विद्यार्थी वर्ग हा विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित, टप्पा अनुदान शाळांमध्ये शिकत आहे. त्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जात नाहीत. तेथील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. याचा शासनाने सहानुभूतीने विचार करण्याची गरज असल्याचे काहींनी मत व्यक्त केले आहे.
निर्णय चांगला आहे. अनेक गरजू मुलांचा वह्यांचा खर्च वाचेल. पण, तांदूळ खिचडी उपक्रमाप्रमाणे दप्तराची खिचडी होईल. गरजू विद्यार्थ्यांची वर्गवारी महत्त्वाची आहे.
-नीलेश गायकवाड, मुख्याध्यापक जिजामाता माध्यमिक विद्यालय, भोसरी
पुस्तकांत कोरी पाने देण्याचा निर्णय खरे तर विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यायला हवा. कारण, यामुळे मुलांची लेखन कला योग्य पद्धतीने अभिव्यक्त होऊ शकणार नाही. लेखन कलेत अडथळे येतील.
– संभाजी शिरसाट, मुख्याध्यापक फ्लाइंग बड्स इंग्लिश स्कूल, चिखली
हा उपक्रम राबविण्याचा निर्णय चांगला आहे. पण, तो सर्वसमावेशक विषयांसाठी नाही. तो फक्त भाषा विषयांसाठी होऊ शकतो. गणित, विज्ञान सारख्या विषयांसाठी मदत होणार नाही.
– एकनाथ बुरसे, मुख्याध्यापक एच. ए. माध्यमिक स्कूल, पिंपरी
हा उपक्रम पूर्णपणे चुकीचा आहे. यातून केवळ एक वर्षासाठी वापर होईल. दरवर्षी तो विद्यार्थ्यांसाठी सहाय्यकारी होणार नाही. कारण, आपण पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा विचार करतो. तर ती रद्दी होईल. या ऐवजी स्वाध्याय पुस्तिका उपक्रम प्रभावी ठरेल.
– महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता मुख्याध्यापक महामंडळ