स्वातंत्र्याच्या दिवशी #यह_आज़ादी_झूठी_है का होतय ट्रेंड?
अनेकांनी कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला

लोकवार्ता । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला आठव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा झेंडा फडकावला. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. सर्व देशासाठी हा आनंदाचा दिवस असतो. नागरिक आपापल्या परिने हा दिवस साजरा करत असतात. पण, आज स्वातंत्र्याच्या दिवशी ट्विटरवर #यह_आज़ादी_झूठी_है हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेकांनी हा हॅशटॅग वापरत आपला रोष व्यक्त केला आहे.
लोकांनी #यह_आज़ादी_झूठी_है हा हॅशटॅग वापरत त्यांना आवडत नसलेल्या गोष्टींता पाढा वाचला आहे. अनेकांनी कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील शेतकरी आज रस्त्यावर आला आहे. सरकार त्यांचं ऐकणार नाही का? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. फक्त सत्तांतर झालं आहे, बाकी काही झालेलं नाही. शेतकरी अजूनही अधिकाराच्या प्रतिक्षेत आहे, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. अनेकांनी यासंदर्भात विविध फोटो शेअर केले आहेत.
‘आजही देशातील महिलांवर अत्याचार होत आहेत, त्यांना स्वातंत्र्य कधी मिळणार’. ‘हजारो लोक आज उपाशी आहे, त्यामुळे हे स्वातंत्र्य खोटे आहे’. ‘देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या महिलेला तिच्या जातीमुळे लक्ष्य केले जाते. हे स्वातंत्र्य आहे का?’ ‘ज्या देशात जातीवाद, अंधश्रद्धा, धर्मवाद, मानसिक गुलामगिरी आहे, तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही’, ‘ज्या देशात दलितांवर अत्याचार होतात, त्यांच्यासोबत भेदभाव होतो अशा देशाला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणायचं का?’ अशा प्रकारचा मजकूर लिहित नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ही बातमी लिहित असताना जवळपास १ लाख ३० हजार लोकांनी हा हॅशटॅग वापरला होता.