पावसाळ्यापूर्वीच हि अवस्था…!राजगुरूनगर बसस्टँड वर साचलं पाणी
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे ; मात्र पावसाळ्याच्या तोंडावर अजूनही दुरुस्ती नाही.
पुणे । लोकवार्ता-
संपूर्ण महाराष्ट्र हा पावसाची प्रतीक्षा करत असला तरी कित्येक ठिकाणी अजूनही रस्त्याची कामे झालेली नाही. यातच पुण्यात पहिला पाऊस पडलेला असताना राजगुरूनगर येथे मोठे खड्डे निर्माण झाले आहे.पुण्यातील राजगुरूनगर एसटी बस आगारात पहिल्याच पावसात पाण्याची मोठमोठी डबकी साचली आहेत. त्यामुळे या डबक्यातील साचलेले खराब पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे गेले कित्तेक दिवस आगारात मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि ते न भरल्याने आता या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे. प्रवाशांसोबत बस चालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणाऱ्या या मार्गावरील राजगुरूनगर एस टी बस आगार हे एक महत्त्वाचे बस स्थानक आहे. मात्र गेल्या कित्तेक दिवसापासून या आगारात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये आता पावसाचे पाणी साचत आहे. या ठिकाणी येणाऱ्या बस या खड्डयांतून जात असताना अनेक प्रवाशांच्या अंगावर खराब आणि गढूळ मैलापाणी उडत आहे.

राजगुरूनगर हे तालुक्याचे ठिकाण आहे. यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुणे शहरात नोकरीनिमित्त अनेक नागरिक एसटी बसने प्रवास करत आहेत. यामुळे बस स्थानकात हजारो प्रवासी रोज येत असतात. त्यांनाही मोठ्या प्रमाणत हा त्रास सहन करावा लागत आहे. राजगुरूनगर आगार व्यवस्थापन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे आगाराने आधीच करायला हवी होती. मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने पुढील काही महिने त्रास सहन करावा लागणार असल्याचे •येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले आहे.