नगरसेविकेच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत मागितली ४० हजाराची खंडणी
पैशांची चणचण भासत असल्यामुळेच जस्ट डायलवरून नंबर घेत फोन करून खंडणी मागितली

लोकवार्ता।प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकेच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत चाळीस हजार रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सचिन मारुती शिंदे (वय ३२, रा.कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने जस्ट डायल करून मोबाईल क्रमांक मिळवत खंडणी मागितली होती.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी युवराज लोणकर हे कोंढवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका नंदा लोणकर यांचे चिरंजीव आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर फोन करून तुला ठार मारण्यासाठी एका गुंडाने साडेसहा लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे सांगित ४० हजार रुपये खंडणी मागितली होती.
याबाबत युवराज यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. खंडणी विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत तांत्रिक विश्लेषण केले असता त्यांना आरोपी सचिन शिंदे हा वारंवार फोन करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला सापळा लावून पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत पैशांची चणचण भासत असल्यामुळेच त्याने जस्ट डायलवरून नंबर घेत युवराज यांना फोन करून खंडणी मागितली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौन्दर, रवींद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने केली आहे.