‘आज भरती आहे…उद्या ओहोटी येणार’; राज ठाकरेंचा भाजपाला इशारा
लोकवार्ता :भाजपला सध्या देशात भरती आली असली तरी पुन्हा कधी तरी ओहोटी लागत असते हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे आज भाजपनेही हे लक्षात ठेवावे की आज जरी भरती असली तरी कधी ना कधी ओहोटी ही लागत असते असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. राज ठाकरे यांनी आजच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष स्थापनेपासून ते नाशिकच्या महानगरपालिकेवर सत्तेत येण्यापर्यंतचा इतिहास त्यांनी सांगितला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. गेल्या १७ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी मोठी साथ दिली, मनसैनिकांचे सहकार्य मिळाले, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कित्येक लोकांनी खस्ता खाल्या, कष्ट केलेत, त्यानंतर भाजपला देशभरात सत्ता मिळाली आहे. १९५२ पासून जनसंघ संघर्ष करत होता. १९५२ ते २०१४ या काळात भाजपने अनेक संकटांचा सामना केला. अनेक गोष्टीतून पक्ष जात असतो. आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ लवकरच दूर होईल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
मनसे नेते संदीप देशपांडेवरील झालेल्या हल्ल्यावर राज ठाकरे म्हणाले की, संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्यानंतर मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं, कोणी केलं? पण, एक निश्चित सांगतो, ज्यांनी केलं, त्यांना पहिलं समजेल हे त्यांनी केलं आहे. मग, सगळ्यांना समजेल हे त्यांनी केलं आहे. मात्र, माझ्या मुलांचं रक्त वाया जाऊन देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. या फडतूस लोकांसाठी नाही.
असं एक आंदोलन दाखवा जे मनसेने अधुरं सोडलंय. टोलनाक्याचं आंदोलन असो वा मराठी पाट्यांचं, पाकिस्तानी कलाकारांना बंदी करणं असो की मोबाईलवर वाजणारी मराठी भाषेतली रिंगटोन… सगळीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रिझल्ट दिलाय. मनसेने नुकतंच भोंगेविरोधी आंदोलन केलं. ज्याचा रिझल्ट तुम्ही सगळेजण जाणता… पण त्यादरम्यान आपल्या १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर तत्कालिन सरकारने गुन्हे दाखल केले. आपल्याशी पंगा घेतला, शेवटी मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं ना, असं राज ठाकरे म्हणाले.
एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मला विचारलं होतं की, ‘तुमची ब्लू फिल्म आलीय ती…’. मी म्हटलं सालं ती काढली असती तर बरं झालं असतं, यांनी किमान बघितली तरी असती. ब्लू प्रिंट काढलीय, कुणी बघितलीच नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.