पुणे महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील हरकती-सूचनांवर सुनावणीचा आजचा दुसरा दिवस
-शहरातील विविध प्रकल्पाचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी येणार आहेत.
पुणे | लोकवार्ता-
आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील हरकती व सूचनांवर सद्या सुनावणी आहे. प्रभाग रचनेच्या प्राधिकृत आराखड्यावर निवडणूक आयोगाच्या वतीनं सुनावणी सुरु आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी दहा वाजता यासुनावणीला सुरवात होत आहे. यशदाचे महासंचालक आणि राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत अधिकारी एस. चोक्कलिंगमयांच्यापुढे या हरकती-सूचना सादर केल्या जात आहेत. काल दिवसभरात आलेल्या 1 हजार 515 हरकती-सूचनांपैकी 353 हरकती गुरुवारी ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर 2 हजार 081 हरकतींवर आज सुनावणी होईल. काल दिवसभरात दिवशी नव्या रचनेतील प्रभाग 1 ते 20, 27 ते 31 आणि 33 ते 35 या प्रभागातील तक्रारदारांना बोलावण्यात आले होते. यामध्ये आजी-माजी नगरसेवक, नागरिक, सोसायट्यांचा समावेश होता. गटश: या हरकती नियोजित केल्या आहेत. चोक्कलिंगम यांनी हरकती-सूचना ऐकून घेतल्या. दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे.

विकासकामांच्या मंजुरीचा धडाका
प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती-सूचनांची सुनावणी झाली की आरक्षणे जाहीर होतील . त्यानंतर निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यापूर्वीच शहरातील विविध प्रकल्पाचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी येणार आहेत. आचारसंहिताही लागू होण्यापूर्वी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्यांनी जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेण्याला सुरूवात केली आहे. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत दीड हजार कोटी रुपयांचा जायकाचा प्रस्ताव आणि 300 कोटी रुपयांचा नदी सुशोभिकरणाचा प्रस्ताव यासह अन्य अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी आणले जाणार आहेत.
प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणीसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव दीपक नलावडे, राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव अतुल जाधव, राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, पुणे महापालिकेतील उपायुक्त आणि निवडणूक अधिकारी अजित देशमुख आदी प्रशासकीय अधिकारीही उपलब्ध होते. याबरोबरच ज्या प्रभागातील तक्रारदारांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते. त्यातील जे अनुपस्थित राहिले त्यांची पुन्हा सुनावणी होणार नाही. असे ही सांगण्यात आले आहे.