“महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १९ मधील पत्राशेड लिंकरोड पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थ्यांना त्यांच्या सदनिकांचे हस्तांतरण”
-सदनिकांचे हस्तांतरण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपरी | लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १९ मधील पत्राशेड लिंकरोड पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थ्यांना त्यांच्या सदनिकांचे हस्तांतरण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास आमदार आण्णा बनसोडे, प्रभाग अध्यक्ष शैलेश मोरे, नगरसदस्य शितल शिंदे, नगरसदस्या जयश्री गावडे, माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते दिपक मेवानी, रमेश शिंदे, प्रवीण वडमारे, प्रताप खैलारीया, अविनाश इंगवले, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा इंगवले उपस्थित होते.,
महापौर माई ढोरे म्हणाल्या, आपली महानगरपालिका श्रीमंत महापालिका म्हणून गणली जाते.या औद्योगिकनगरीत जास्तीत जास्त नागरिकांना घरे देण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. आपले स्वत:चे घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आरोग्यासाठी लाभदायक असते, आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी आपण आपले योगदान द्यावे असे सांगून नागरिकांच्या सोयीसाठी मोकळ्या जागेत वाचनालये, उद्याने तसेच सुसज्ज दवाखाने, रुग्णालये उभारण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार आण्णा बनसोडे यांनी पुनर्वसन प्रकल्पाची योजना चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच महापालिकेने लिफ्ट सारख्या सुविधा लाभार्थ्यांना पुरवाव्यात असेही ते म्हणाले.

जेएनयूआरएम बीएसयूपी शहर झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत लिंक रोड पत्र शेड येथे ६७२ सदनिका बांधण्यात येणार आहेत. हा प्रकल्प ६ इमारतींमध्ये राबविण्यात येत आहे. त्यापैकी इमारत क्र. सी या एका इमारतीच्या १०७ सदनिका बांधून पूर्ण झाले असल्याने त्यांच्या वाटपाची सुरुवात आज करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते अशोक वाघमारे, शहानवाज शेख, बसवंत चंदनशिवे, गौतम बनसोडे आणि गणपत गायकवाड यांना सदनिकांच्या किल्ल्या आज प्रदान करण्यात आल्या असून उर्वरीत सदनिकाधारकांना लवकरच ताबा देणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी दिली.
नगरसदस्य शितल शिंदे, नगरसदस्या जयश्री गावडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.