दोन वर्षांनंतर देहूनगरीत दुमदुमला हरिनामाचा गजर
-तुकाराम बीज निमित्ताने देहू नगरीत भाविकांची मोठी गर्दी.
देहू | लोकवार्ता-
तब्बल दोन वर्षानंतर देहूत जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा बिजोत्सव पार पडत आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळं कार्यक्रमांवर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. परंतु, यावर्षी कोरोना आटोक्यात आल्यामुळे वारकऱ्यांना देहूत प्रवेश देण्यात आला असून ‘याची देही, याची डोळा’ हा सोहळा पाहण्यास मिळत आहे. देहू नगरी ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमून गेली असून ३७४ वा सदेह वैकुंठगमन सोहळा पार पडत आहे.

दोन वर्षांनंतर देहूनगरीत जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बिजोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. यावर्षी करोनाचे निर्बंध शिथिल झाले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल झाले आहेत. दर्शन रांग तसेच इतर ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.