पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
लोकवार्ता : पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत सामना या वृत्तपत्रातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पक्षाची शिस्त मोडल्याचा आरोप शिवतारे यांच्यावर करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार, विजय शिवतारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत होते. शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वीच आपण शिंदे गटात जात असल्याचा निर्णय जाहीर केला होता.
विजय शिवतारे यांच्या या हकालपट्टीनंतर पुरंदर तालुक्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. शिवतारे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुरंदर तालुक्यातील इतर शिवसैनिक आणि शिवतारे समर्थक यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.