मोशीतील ग्रामस्थांचा प्रशासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध; भाजपाचे निखिल बोऱ्हाडे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
लोकवार्ता : देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचरा मोशी डेपोमध्ये जिरविण्याचा धोरणात्क निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाला कडाडून विरोध करीत भाजपच्या निखिल बोऱ्हाडे यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली.

शहरातील कचऱ्याचा मोठा ताण आपल्यावर असताना कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचरा शहरात ‘डंप’ करू नये, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. याबाबत निखिल बोऱ्हाडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड शहरात दररोज निर्माण होणाऱ्या ओला – सुका कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा गंभीर प्रश्न समोर असताना तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी मोशी कचरा डेपोची जागा अपुरी ठरत असताना महापालिका प्रशासनाने आता शहरालगतच्या देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कचराही मोशी कचरा डेपोत जिरविण्याचा धोरणात्क निर्णय घेतला आहे. याला कडाडून विरोध करण्यात येत आहे.
सध्या ओला – सुका कचायाची विल्हेवाट कशी लावायची हा गंभीर प्रश्न समोर असताना आता अतिरिक्त कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न उभा राहणार आहे. याचा त्रास कचरा डेपो परिसरातील रहिवाशांना होणार आहे. प्रशासनाचा हा निर्णय अन्यायकारक असनू, त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास मोशीकर नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासना विरोधात तीव्र निषेध आंदोलन करतील असा इशारा देखील यावेळी बोऱ्हाडे यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड शहरावर सध्या ३५ लाख लोकसंख्येच्या कचऱ्याचा ताण आहे. मोशी येथील रहिवासी या कचरा डेपोच्या दुर्गंधीमुळे पूर्वीपासून त्रस्त आहेच. शिवाय आता बाहेरचा कचरा या कचरा डेपोमध्ये येणार असेल तर हा ताण आणखी वाढणार आहे. त्यामुळे शहराबाहेरील कचरा कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी आणू नये अशी आग्रही मागणी यावेळी केली, असेही निवेदनात म्हंटले आहे..