“विनोद तावडेंना पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी”
सध्या राष्ट्रीय सचिव व हरयाणाचे प्रभारी असलेल्या तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी । लोकवार्ता-
मागील काही महिन्यांपासून नाराज असलेले भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना पक्षानं राष्ट्रीय संघटनेत बढती दिली आहे. सध्या राष्ट्रीय सचिव व हरयाणाचे प्रभारी असलेल्या तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महिन्यांतच राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर काही दिवसांतच कार्यकारिणी तावडे यांच्यासह पाच जणांना बढती देत पक्षानं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत तावडे यांना तिकीट देण्यात आलं नाही. तेव्हापासून ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना राज्याच्या कार्यकारिणीपासूनही दूर ठेवण्यात आलं आहे. मागील वर्षी त्यांच्याकडे हरयाणाचे प्रभारीपद व राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण त्यानंतरही त्यांची नाराजी दूर झाली नसल्याची चर्चा राजकीय वर्तूळात होती.

राज्याच्या राजकारणापासून सध्या कोसो दूर असलेले तावडे यांना आता पक्षानं राष्ट्रीय राजकारणातच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे आजच्या नियुक्तीवरून स्पष्ट झाले आहे. तावडे यांची सचिव पदावरून सरचिटणीस पदी बढती करण्यात आल्यानं त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील दबदबा वाढणार आहे. पंतप्रधानांच्या मन की बात चे समन्वयक, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे समन्वयक या जबाबदाऱ्याही त्यांच्याकडे आहेत.
तावडे यांच्यासह पाच जणांच्या नावांची राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी घोषणा केली आहे. बिहारमधील ऋतुराज सिन्हा व झारखंड येथील आशा लाकडा यांना सचिव, तर पश्चिम बंगालमधील भारती घोष व शहजाद पूनावाला यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.