मनमोहन सिंगांऐवजी शरद पवारांना पंतप्रधान केलं असतं तर ?
पवार हे जनाधार असलेले लोकप्रिय नेते आहेत.

लोकवार्ता । प्रतिनिधी
मनमोहन सिंग यांच्या ऐवजी काँग्रेसने शरद पवार यांना पंतप्रधान केलं असतं तर देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं? यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं भाष्य केलं आहे. मनमोहन सिंगांऐवजी पवारांना पंतप्रधान केलं असतं तर काँग्रेसची आज जी दुर्दशा झाली आहे, तेवढी दुर्दशा झाली नसती, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवले काल इंदौरला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता हे विधान केलं आहे. २००४ लोकसभा निवडणुकीत यूपीएला बहुमत मिळालं होतं. त्यावेळी मी दोन पर्याय सूचवले होते. एक म्हणजे सोनिया गांधींना पंतप्रधान करावं नाही तर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करावं. पवार हे जनाधार असलेले लोकप्रिय नेते आहेत. ते पंतप्रधानपदासाठी योग्य होते. पवारांना पंतप्रधान करावं म्हणून आपण सोनया गांधींकडे आग्रहही धरला होता. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, असा गौप्यस्फोटही आठवेल यांनी केला. तसेच पवारांना पंतप्रधान केलं असतं तर काँग्रेसची अशी दुर्दशा झाली नसती, असा दावाही त्यांनी केला.

विदेशीत्वाचा मुद्दाच राहिला नाही
त्यावेळी मी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हावं असा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी त्यांच्या विदेशीत्वाचा मुद्दाही राहिलेला नव्हता. पण माझं ऐकलं नाही. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा होऊ शकतात तर सोनिया गांधी का भारताच्या पंतप्रधान होऊ शकत नाही? असा सवाल करतानाच सोनिया गांधी या राजीव गांधी यांच्या पत्नी आहेत. लोकसभेच्या सदस्या आहेत. मग त्या पंतप्रधान का होऊ शकत नाही? असं ते म्हणाले.
