या देशात जेव्हा जेव्हा औरंगजेब येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी उभे राहतात
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा विश्वनाथ यांच्या मंदिरात प्रार्थना केल्यानंतर ‘काशी विश्वनाथ धाम’चे उद्घाटन केलं आणि ते देशाला समर्पित केलं.
काशी । लोकवार्ता-
औरंगजेबाच्या अत्याचार आणि त्याच्या दहशतीची ही नगरी साक्षीदार आहे. ज्याने तलवारीच्या जोरावर इथली सभ्यता बदलण्याचा प्रयत्न केला, ज्याने संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला, पण या देशाची माती जगापेक्षा वेगळू आहे. या भूमीत जेव्हा औरंगजेबचा अत्याचार वाढतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजही उभे ठाकतात. एखादा सालार मसूद येतो तेव्हा राजा सुहेलदेवसारखे वीर योद्धा आपल्या एकतेची जाणीव करुन देतात, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.
काशी ही शब्दांची नसून ती भावनांची निर्मिती आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. काशी म्हणजे जीवन आहे, काशी म्हणजे प्रेमाची परंपरा आहे, काशी ती आहे जिथे सत्य हेच संस्कार आहेत, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदींचा काशी दौरा
पीएम मोदी म्हणाले काशी अविनाशी आहे. काशीत एकच सरकार आहे, ते म्हणजे ज्याच्या हातात डमरू आहे, त्याचं सरकार आहे. ज्या काशीत गंगा आपला प्रवाह बदलून वाहते त्या काशीला कोण रोखू शकणार? पीएम मोदी म्हणाले याधी इथं केवळ तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये मंदिर परिसर होता. आता तो ५ लाख स्क्वेअर फूट झाला आहे. आता मंदिर आणि मंदिर परिसरात 50 ते 75 हजार भाविक येऊ शकतील. म्हणजे आधी गंगा मातेचे दर्शन-स्नान आणि तेथून थेट विश्वनाथ धाम.

विश्वनाथ धामचं हे नवीन संकुल केवळ भव्य इमारत नाही, तर ते आपल्या भारताच्या शाश्वत संस्कृतीचे प्रतीक आहे, ते आपल्या आध्यात्मिक आत्म्याचे प्रतीक आहे, भारताची प्राचीनता, परंपरा, भारताची ऊर्जा, गतिशीलता यांचं ते प्रतीक आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. काशीत प्रवेश करताच सर्व बंधनातून मुक्त होतो असे आपल्या पुराणात सांगितलं आहे. भगवान विश्वेश्वराच्या आशीर्वादाने, येथे आल्याबरोबर एक अलौकिक ऊर्जा आपल्या अंतर्मनाला जागृत करते.