कोणत्या मंत्र्याने केली दहशतवाद्यांकडून जमीन खरेदी ?
देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत केले खुलासे.
मुंबई| लोकवार्ता-
गेल्या महिन्याभरापासून मुंबईमध्ये नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी एकमेकांविरोधात बरेच आरोप केले आहेत. एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत.
कुर्ल्यामध्ये २.८० एकर म्हणजेच १ लाख २३ हजार स्क्वेअर फूटची जागा ज्याला गोवावाला कंपाऊंड असं देखील म्हटलं जातं. कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर ही जागा असून या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये २०१९मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत.

२००३ मध्ये जेव्हा नवाब मलिक मंत्री होते तेव्हा हा सौदा करण्यात आला होता. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावं लागलं. पण तुम्हाला माहिती नव्हतं की सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्बब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली ३ एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का?असे मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मांडले.