D-Mart मध्ये स्वस्तात किराणा विकणारे कोण आहेत राधाकृष्ण दमानी?
Avenue Supermart नावाची त्यांची पहिली कंपनी

लोकवार्ता । प्रतिनिधी
शेअर बाजारानं अनेकांना रातोरात श्रीमंत केलंय, तर काहींना रसातळालाही नेलंय. बरेच लोक शेअर बाजारातील तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांना आपला आदर्श मानतात. तसेच अनेक जण राकेश झुझुनवालांकडून गुंतवणुकीच्या टिप्सही घेतात. पण राकेश झुनझुनवाला हे स्वतः राधाकृष्ण दमाणी यांच्याकडून गुंतवणुकीच्या टिप्स शिकलेत. डीमार्ट जवळपास सगळ्यांना माहीत असेल, त्याच डीमार्टचं साम्राज्य हे राधाकृष्ण दमाणींनी मोठ्या कष्टानं उभं केलंय.
राधाकृष्ण दमानी डी-मार्टचे संस्थापक
१९५४ मध्ये बिकानेर राजस्थान येथे जन्मलेले राधाकृष्ण दमानी डी-मार्टचे संस्थापक आहेत. बिझनेस लीडर आणि स्टॉक एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण दमानी यांनी प्रत्यक्षात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले नाही. जर आपण गेल्या वर्षी जुलैबद्दल बोललो तर तेव्हा त्यांचे नेटवर्थ त्यावेळी १४ अब्ज डॉलर होते.
पहिल्यांदा राधाकृष्ण दमानी यांनी Avenue Supermart नावाची कंपनी सुरू केली. राधाकृष्ण दमानी शेअर बाजारातील एक ज्येष्ठ तज्ज्ञ, RD या नावाने ओळखले जातात. त्यांनी युनायटेड ब्रेवरीज, व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये भागीदारी खरेदी केलीय. त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये रॅडिसन ब्लू रिसॉर्ट मुंबईचा समावेश आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर बनले ब्रोकर
राधाकृष्ण दमानी मुंबईत एका चाळीतल्या खोलीत मोठे झाले. त्यांनी मुंबईतील कॉलेजमधून कॉमर्सचे शिक्षण घेतले, परंतु आरडींनी पहिल्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतरच शिक्षण सोडले. वयाच्या ३२ व्या वर्षी आर. के. दमानी यांचे वडील वारले आणि ते त्यांच्या भावाच्या स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात सामील झाले.
दमानींनी नेमका कसला व्यवसाय केला?
राधाकृष्ण दमानी यांनी प्रथम बॉल बेअरिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी काही काळानंतर ही कंपनी बंद केली. १९८९ मध्ये आर. के. दमानी यांनी ब्राईटस्टार ही गुंतवणूक कंपनी सुरू केली. १९९२ मध्ये दमानी सेबी नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर बनले. यानंतर दमानी यांनी ब्रोकरेज व्यवसायात बरीच प्रगती केली. मल्टिबॅगर स्टॉकच्या सुरुवातीच्या ओळखीसाठी ते प्रसिद्ध झाले. राधाकृष्ण दमानी हे उच्च दर्जाचा व्यवसाय असलेल्या कंपन्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि योग्य किमतीत त्यांचे शेअर्स खरेदी करून नफा कमावण्याच्या त्यांच्या रणनीतीसाठी प्रसिद्ध आहेत.
हर्षद मेहतांच्या काळात उचलला फायदा
राधाकृष्ण दमानी दलाल स्ट्रीटमध्ये आरडी म्हणून प्रसिद्ध होते, प्रसिद्ध शेअर गुंतवणूकदार चंद्रकांत संपत यांच्याकडून ते प्रभावित झाले. हर्षद मेहता यांच्या काळात दमानींनी शेअर बाजारातून वेगाने नफा मिळवण्यात मोठे यश मिळवले.
राधाकृष्ण दमानी यांनी सुपरमार्केट रिटेल चेन डी-मार्टची सुरुवात केली. डी-मार्टचे पहिले स्टोअर २००२ मध्ये उघडण्यात आले. DMart चे लक्ष्य ग्राहकांना परवडणारे सामान पुरवणे आहे. गेल्या १५ वर्षात राधाकृष्ण दमानी यांनी सुपरमार्केट चेनला सर्वात फायदेशीर अन्न आणि किराणा किरकोळ विक्रेता बनवलेय. देशभरात त्यांची २०० हून अधिक दुकाने आहेत. वर्ष २०१७ मध्ये डी-मार्ट शेअर बाजारात सूचीबद्ध केले गेलेय आणि ते १०२%च्या प्रीमियमवर सूचीबद्ध झाले.
किरकोळ व्यवसायात रिलायन्स आणि बिर्लासारख्या मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले
विशेष म्हणजे राधाकृष्ण दमानी हे देशातील २० श्रीमंतांपैकी एक आहेत. तसेच त्यांना जास्त लाईमलाईटचे जीवनही आवडत नाही. त्यांचा फक्त कामावर विश्वास आहे. राधाकृष्ण दमानी हे डी-मार्ट कंपनीचे मालक आहेत, ज्यांनी किरकोळ व्यवसायात रिलायन्स आणि बिर्लासारख्या मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकलेय.
कुठलेही स्टोअर भाडेतत्त्वावर नाही
डी-मार्टने आपल्या स्टोअरसाठी कधीही जागा भाड्याने घेतली नाही. जेव्हाही स्टोअर उघडले, त्यासाठी त्यांनी स्वतःची जागा खरेदी केली. त्यामुळे त्यांच्या नफ्याचा मोठा भाग जो भाड्याने गेला असता तो वाचला. तसेच त्यातून कंपनीला मोठा फायदा मिळाला आणि आपल्या स्टोअरमध्ये ते कमी किमतीत माल विकू लागले.
मोठ्या मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्टोअर खरेदी करणे डी-मार्टसाठी मोठी गोष्ट नव्हती. परंतु राधाकृष्ण दमानी यांना मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे चाल करायची नव्हती. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या अटींवर व्यवसाय चालवण्याचा निर्धार केला आणि मोठ्या मॉलमध्ये कधीही दुकान उघडली नाहीत. याचे दोन फायदे होते. प्रथम कंपनीची प्रचंड भाड्यातून सुटका झाली आणि दुसरे म्हणजे मॉलमध्ये स्टोअर उघडणाऱ्यांना देखभाल खर्च देखील भरावा लागतो, हा खर्च कंपनीने वाचवला. ज्याचा थेट परिणाम स्टोअरमधील वस्तूंच्या किमतीवर झाला.
मध्यम उत्पन्न गटातील लोकांना डोळ्यांसमोर ठेवून त्या परिसरात त्यांनी दुकाने उघडली. ज्यांना पैशाचं मूल्य कळते, ज्यांना कमी किमतीत मालाची गरज आहे. अशा लोकांना लक्ष्य करून स्टोअर उभारण्यात आली.