नगरसेविकेचे अनधिकृत हॉटेल पाडण्याचे धाडस करणार कोण?…
शेकडो सामान्य कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली

लोकवार्ता।प्रतिनिधी
भोसरी आणि दिघीच्या आसपास रेडझोनचा परिसर आहे. दिघी दारूगोळा डेपोपासून २००० हजार यार्डापर्यंत ही रेडझोनची हद्द आहे. रेडझोनच्या हद्दीत कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे रेडझोनच्या हद्दीत बांधकाम केल्यास महापालिकेकडून त्यावर कारवाई केली जाते. परंतु, ही कारवाई करताना दुजाभाव केला जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

या भागात अनेक सामान्य नागरिकांनी गुठा-दोन गुंठा जागेत राहण्यासाठी घरे उभारली होती. महापालिकेने या घरांवर काही दिवसांपूर्वी कारवाई करून ती जमीनदोस्त केली. त्यामुळे शेकडो सामान्य कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली.
भोसरीतून खडीमशीन रस्तामार्गे डुडूळगावकडे जाताना रेडझोनच्या हद्दीत एका भाजप नगरसेविकेच्या पतीने दुमजली हॉटेल उभारलेले आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने याच हॉटेलच्या परिसरात रेडझोनच्या हद्दीत सामान्य नागरिकांनी राहण्यासाठी बांधलेली घरे जमीनदोस्त केली. पण भाजप नगरसेविकेच्या पतीच्या त्या हॉटेलची एक वीट सुद्धा हलवली नाही. त्यावरून सामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासन रेडझोनच्या त्या हॉटेलवर कोणाच्या दबावामुळे कारवाई करत नाही?, ते हॉटेल कधी जमीनदोस्त करणार?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
ओंकार लॉज नावाने असलेले हे दुमजली हॉटेल आजही रेडझोनमध्ये दिमाखात उभे आहे. हॉटेल आणि लॉज असलेले हे हॉटेल रस्त्याच्याकडेलाच आहे. परंतु, महापालिका प्रशासनाने या हॉटेलच्या एकाही विटेला धक्का लावला नाही. महापालिकेने भाजप नगरसेविकेच्या पतीचे हॉटेल वाचवले आणि सामान्यांची घरे पाडली. त्यामुळे महापालिका प्रशासनाबाबत हे सामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रेडझोनच्या हद्दीत असलेले हॉटेल कोणाच्या दबावामुळे वाचवले आणि आमची घरे कोणाच्या इशाऱ्यावरून पाडली?, हे हॉटेल कधी जमीनदोस्त करणार?, असे प्रश्न हे सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.