टीम इंडियाचे कोच सुनील गावसकर का होऊ शकले नाहीत?
१६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर १९८७मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली

लोकवार्ता।प्रतिनिधी
भारताचे लिटल मास्टर म्हणजेच सुनील गावसकर हे कसोटीत १० हजार धावा पूर्ण करणारे पहिले भारतीय फलंदाज आहेत. भारताच्या क्रिकेट इंतिहासातील महान फलंदाज म्हणून गावसकर ओळखले जातात. भल्याभल्या गोलंदाजांची धुलाई करण्यातही ते पटाईत होते. १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर १९८७मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. ९०च्या दशकातील अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारली. यात संदीप पाटील, अंशुमन गायकवाड, कपिल देव यांची नावे आहेत. मात्र गावसकरांसारखा महान फलंदाज टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक का होऊ शकला नाही, याचे उत्तर कधी कोणाला मिळाले नाही. मात्र आता गावसकरांनी हे कोडे उलगडले आहे.

गावसकर कोचिंगपासून दूर राहण्याचा अर्थ असा नाही, की ते सल्ला किंवा मत देत नव्हते. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड हे खेळाडू गावसकरांकडे मार्गदर्शन घ्यायला जायचे. सचिन आणि द्रविड यांनी हे बर्याच वेळा उघडपणे सांगितले आहे. गावसकर म्हणाले, ”होय, हे खरे आहे की जुन्या टीम इंडियाचे खेळाडू माझ्याकडे येत असत. विशेषत: सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण आणि सेहवागसारखे खेळाडू माझ्याशी बर्याच वेळा बोलले. मला त्याच्याशी खेळाबद्दल बोलणे आवडत असे. त्यांच्या खेळाबद्दल मला जे काही मत होतं, ते मी सांगायचो. त्या खेळाडूंना माझ्या सल्ल्याचा फायदा झाला असेल. परंतु मी कोचिंगचे काम पूर्णपणे करू शकत नाही.”
गावसकर यांनी ‘द अॅनालिस्ट’ नावाच्या यूट्यूब वाहिनीशी झालेल्या संभाषणात सांगितले, ”मी स्वत:ला कधी प्रशिक्षक म्हणून पाहिले नाही, अथवा मी वाटतही नाही. प्रशिक्षक किंवा निवडकर्ता होण्यासाठी आपल्याला एक एक चेंडू पाहावा लागेल आणि माझ्यात इतका संयम नाही. कारण मी छोट्या फरकाने सामने पाहतो. जेव्हा मी खेळत होतो आणि बाद होत होतो, तेव्हाही मी चालू सामना संपूर्ण पाहिला नाही. थोडावेळ सामना पाहिल्यानंतर मी रूममध्ये जायचो आणि पुस्तक वाचायचो. गुंडप्पा विश्वनाथ किंवा माझे काका माधव मंत्री यांच्यासारखे मी कधीच प्रत्येक चेंडू पाहणारा माणूस नव्हतो.”
१९७१-८७ या क्रिकेट कारकिर्दीत गावसकरांनी १२५ कसोटी सामन्यात १०१२२ धावा फटकावल्या. तर १०८ एकदिवसीय सामन्यात ३०९२ धावा केल्या. कसोटीत त्यांची फलंदाजीची सरासरी ५१.१ अशी होती.