उन्हाळ्यात करायची कामे पावसाळ्यात का?; नागरिकांचा सवाल
राज्य सरकारने अर्थसंकल्पाच्या ३३ टक्के निधी खर्चाची मर्यादा महापालिकेवर घातली होती

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने व निबंधही शिथिल झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्ते व विविध वाहिन्याची कामे शहरात सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश भागातील रस्ते व पदपथ खोदलेले असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, कोरोना व लॉकडाऊनमुळे पावसाळ्यापूर्वीची कामे उशिरा सुरू झाली, असा प्रशासनाचा दावा आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळे राज्य सरकारने अर्थसंकल्पाच्या ३३ टक्के निधी खर्चाची मर्यादा महापालिकेवर घातली होती. त्यामुळे वैद्यकीय व आरोग्य व्यवस्थेव्यतिरिक्त अन्य मोठ्या खर्चाची कामे गेल्या वर्षापासून बंद होती. आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने व निबंधही शिथिल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामे सुरू झाली आहेत. यात रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, पदपथांची दुरुस्ती, जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या बदलणे, त्यांची दुरुस्ती, काही ठिकाणी अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंटनुसार रस्त्यांचे सुशोभीकरण अशी कामे सुरू आहेत. त्यासाठी केलेले खोदकाम, त्याचा राडारोडा व पावसामुळे झालेला चिखल, साचणारे पाणी याचा त्रास नागरिकांना सहन लागत आहे. उन्हाळ्यात करायची कामे पावसाळ्यात का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगामी महापालिका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत कामे केली जात असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे.
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते नवीन भोसरी रुग्णालय रस्ता. पीएमपी बसस्थानक ते नियोजित कुस्ती केंद्र रस्ता. पीसीएमटी चौक ते लांडेवाडी चौक रस्ता. नेहरूनगर येथील झिरो बॉईज चौक ते मगर स्टेडियम रस्ता. कासारवाडीतील केशवनगर अंतर्गत रस्ता. निगडीतील पीसीएमसी कॉलनी. यमुनानगर लोकमान्य टिळक ते दुर्गानगर रस्ता. पिंपरीतील तपोवन रस्ता व अशोक थिएटर रस्ता. पिंपळे सौदागर शिवार चौक रस्ता. जुनी सांगवी शितोळेनगर ते माकन चौक. नवी सांगवी साई चौक ते फेमस चौक. पिंपळे गुरव महाराजा हॉटेल ते माहेश्वरी चौक, पूर्णानगर अंतर्गत रस्ता. त्रिवेणीनगर कॉर्नर. या ठिकाणी कामे सुरु आहेत