भाजपा पुन्हा एक मुख्यमंत्री बदलणार ?
विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पदाचा राजीनामा दिला

लोकवार्ता । प्रतिनिधी
पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील याच नेतृत्वबदलानंतर आता पुन्हा भाजपाशासित राज्यामध्ये नेतृत्व बदल होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रुपाणींऐवजी पटेल यांच्या हाती गुजरातचा कारभार सोपवल्याने भाजपाशासित राज्यात मागील सहा महिन्यांमधील पाचव्यांदा मुख्यमंत्री बदल झाला. या नेतृत्वबदलाची चर्चा सुरु असतानाच आता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर आज दिल्लीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ठाकुर हे दिल्लीवरुन शिमल्याला परतले होते. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाची भेटही घेतली होती. मात्र आता पुन्हा त्यांना दिल्लीवरुन बोलावणं आल्याने हिमाचलमध्ये नेतृत्व बदलांच्या चर्चा सुरु झाल्यात. ठाकुर यांना आलेल्या दिल्लीमधील आमंत्रणाचा संबंध गुजरातशी जोडला जात आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या सांगण्यानंतरच रुपाणी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
काँग्रेस म्हणते पद जाणार…
गुजरातमधील मुख्यमंत्री बदलल्यानंतर जयराम ठाकुर यांना शिमल्यात पोहचल्यानंतर ४८ तासांमध्ये पुन्हा दिल्लीत बोलवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसने यावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका सुरु केलीय. मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवलं जाणार असल्याचं हिमाचल प्रदेश काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र भाजपाने हा दावा फेटाळून लावलाय. भाजपाने २०२२ ची निवडणुक ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं आधीच स्पष्ट केल्याचा पुन्हा उल्लेख केलाय. सकाळीच ठाकुर दिल्लीला रवाना झालेत.
मागील आठवड्यात होते दिल्लीत
मुख्यमंत्री जयराम ठाकुर मागील आठवड्यामध्ये बुधवारी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी दिल्ली दौऱ्यावर गेलेले. बुधवारी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांबरोबरच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली होती. गुरुवारी जयराम ठाकुर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिमाचल प्रदेश विधानसभेच्या विशेष अधिवेशानाचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री मध्य प्रदेशमधील उज्जैनला गेले होते. रविवारीच ते दिल्लीहून शिमल्याला गेलेले. असं असताना त्यांना परत दिल्लीत बोलवल्याने चर्चांना उधाण आलंय.
भाजपाने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले
२०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यावर कितीही विरोध वा टीका झाली तरीही राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याचे टाळणाऱ्या भाजपाने गेल्या सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. लोकांची नाराजी, पक्षनेतृत्वाचा विश्वास गमाविणे किंवा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवूनच भाजपाने मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडमध्ये मार्च महिन्यात त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येणे शक्य नसल्याने अवघ्या ११४ दिवसांमध्येच रावत यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तराखंडमध्ये भाजपाने दोन मुख्यमंत्री बदलले.
आसामध्ये गेल्या मे महिन्यात भाजपा पुन्हा सत्तेत येताच सर्वानंद सोनोवाल यांना बदलून भाजपाने हेमंत बिश्वा सरमा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली होती. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास पक्षाने भाग पाडले होते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका सव्वा वर्षावर येऊन ठेपल्या असताना विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.