दिवाळीपूर्वी अनिल देशमुखांसह राष्ट्रवादीचे नेते तुरुंगात दिसणार ?
सध्या देशमुख हे गायब आहेत

लोकवार्ता । प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. काल आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड टाकली. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड टाकली आहे.
सध्या देशमुख हे गायब आहेत. ईडी त्यांचा शोध घेत असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी देखील वाढत आहेत. अशातच, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देशमुख यांच्या अटकेबाबत महत्वाचा दावा केला असून त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत देखील धक्कादायक दावा केला आहे.
‘दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे,’ अशी भविष्यवाणी सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. यासोबतच, अनिल परब यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट परब यांनीच राज्यातील साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. लॉकडाऊन असताना परब बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधत होते. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असं देखील सोमय्या यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांनीही त्यांच्या पत्नीच्या नावे 19 बेनामी बंगले बांधले आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी, असं सांगतानाच तुमच्या काय मी उद्धव ठाकरेंच्या धमक्यांनाही घाबरत नाही. परब यांना आज ना उद्या कोर्टात जावंच लागमार आहे. परब हे जेलमधूनच कोर्टात जाऊ शकतात. सर्वांना कायदा समान आहे, असं ते म्हणाले.
घोटाळेबाजांचं नेतृत्व
मला आणि माझ्या मुलालाही धमक्या मिळत आहेत. पण आम्ही या धमक्यांना घाबरत नाही. अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचा घोटाळा बाहेर काढणारच. आम्ही थांबणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे स्टंटबाज आहेत. ते लक्ष डायव्हर्ट करण्याचं काम करत आहेत. उद्धव ठाकरेंनी नेमलेले मंत्री, पोलीस आयुक्त फरार झाले आहेत. हे सरकार सामान्य जनतेचं नव्हे तर घोटाळेबाजांचं नेतृत्व करत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
सोमवारी कोल्हापूरला जाणार
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रकृती लवकर बरी व्हावी. सोमवारी मी कोल्हापूरला जाणार आहे. मुश्रीफ यांनी बेनामी साखर कारखाना उभारला हे मी कोल्हापूरकरांसमोर मांडणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
सोमय्यांचे नेमके आरोप काय?
दरम्यान सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. मुश्रीफ कुटुंबाने १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तर, मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं, असं मुश्रीफ म्हणाले होते.