राष्ट्रवादीला विजयी करा…पिंपरी चिंचवड चे सर्व प्रश्न सोडवण्याचे अजित पवार यांचे आश्वासान
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची नवी जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
पिंपरी । लोकवार्ता
येत्या निवडणुकीत मित्रपक्षाने ताकदीपेक्षा जास्त जागांची मागणी त्यांनी केली, तर मात्र राष्ट्रवादीला स्वबळावर निवडणूक जिंकावी लागेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर नगरसेवक निवडून दिले, तर पाण्यासह शहराचे सर्व प्रश्न मार्गी लावणार, असा शब्द देतो. कारण, स्टंटबाजी माझ्या स्वभावात नाही, असे ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची नवी जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना पदांचे वाटप करण्यात आले. त्यांना उद्यापासूनच जनतेच्या कामाला लागण्याचा आदेश त्यांनी दिला. विरोधकांच्या जाळ्यात न अडकता काही राजकीय पक्षांनी निर्माण केलेल्या इश्यूमागे फरफटत जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी मनसेचे नाव न घेता कार्यकर्त्यांना केले. आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, समन्वयक योगेश बहल आदी यावेळी उपस्थित होते.