‘स्वराज्य झुंज’ समाजभुषण पुरस्काराचे सोमवारी होणार शानदार वितरण
‘साप्ताहिक झुंज’ व ‘स्वराज्य रक्षक’ न्यूज यांच्या वतीने कर्तृत्ववान व प्रतिभावान मान्यवरांचा गौरव
लोकवार्ता : पिंपरी चिंचवड शहरासह राज्यभरात गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या धार धार लेखणीने पत्रकारिता क्षेत्रात आपला ठसा उमटविलेल्या ‘साप्ताहिक झुंज’ व ‘स्वराज्य रक्षक’ न्यूज यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व प्रतिभावान मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून सोमवार (दि. २७ मार्च) रोजी ‘स्वराज्य झुंज’ समाजभूषण पुरस्कार २०२३ चे शानदार आयोजन करण्यात आले आहे.

साप्ताहिक झुंज व स्वराज्य रक्षक न्यूज प्रणित आयोजित या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते संजय खापरे यांच्या हस्ते मान्यवरांना शिल्ड व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नामदेव जाधव यांची या सोहळ्यास प्रमुख उपास्थिती राहणार आहे.
प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, कला, सांस्कृतिक, उद्योजक, शैक्षणिक आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्यांचा सन्मान या सोहळ्यात “स्वराज्य झुंज” हा पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
“स्वराज्य झुंज” समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे हे प्रथमच वर्ष आहे. सोमवार (दि. २७ मार्च) रोजी सायंकाळी ४ वाजता ताथवडे येथील हॉटेल रागा इम्पेरिओच्या गोल्डन हॉल मध्ये या पुरस्कार सोहळ्याचे शानदार वितरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक सहकारी पत्रकार मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या सोहळ्यास साप्ताहिक झुंज व स्वराज्य रक्षक न्यूजचे वाचक, जाहिरातदार, मित्रपरिवार व हितचिंतकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ‘साप्ताहिक झुंज’ न्यूज चे सहसंपादक प्रसाद अनिलराव वडघुले आणि ‘स्वराज्य रक्षक’ न्यूज चे संपादक प्रा. सोमनाथ सुभाष नाडे यांनी केले आहे.